त्रुडो सन्मानार्थ आयोजित स्नेहभोजन वादात

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांचा भारत दौरा आणखी एका वादात सापडला आहे! त्रुडो यांच्या सन्मानार्थ भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभाला दोषी खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रित केल्याने वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणावरून वाद निर्माण होताच सारवासारव करण्यासाठी उच्चायुक्त नादिर पटेल यांनी खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल याला दिलेले समारंभाचे निमंत्रण रद्द केले आहे, तर अटवाल भारतात कसा आला या बाबत चौकशी करण्याचे परराष्ट्र मंत्रालयाने ठरविले आहे.

या बाबत त्रुडो यांनी वार्ताहरांना सांगितले की, आम्ही हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. आम्ही निमंत्रण रद्द केले. ज्या संसद सदस्याने अटवाल याचे नाव समाविष्ट केले त्याला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले.

पंजाबच्या माजी मंत्र्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला खलिस्तानचा दहशतवादी जसपाल अटवाल याला दिलेले स्नेहभोजन कार्यक्रमाचे निमंत्रण त्यानंतर कॅनडाचे उच्चायुक्त नादीर पटेल यांनी रद्द केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असून त्यांच्या सन्मानार्थ पटेल यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र जसपाल अटवाल यांना देण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा संदर्भ असलेल्या प्रश्नांबाबत आम्ही भाष्य करणार नाही, असे येथील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाने स्पष्ट केले आहे. पंजाबचे तत्कालिन मंत्री मल्कियतसिंग सिद्धू यांची व्हॅन्कोव्हर येथे १९८६ मध्ये हत्या करण्याचा अटवाल यांनी प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले होते.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्यासह अनेकांनी त्रुडो यांच्या खलिस्तानसमर्थनाच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर अटवाल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे. आपला देश भारत अथवा अन्यत्र फुटीर शक्तींचे समर्थन करणार नाही, असे आश्वासन त्रुडो यांनी अमरिंदरसिंग यांना दिले.

दरम्यान, त्रुडो यांची पत्नी सोफी यांची जसपाल अटवालने मुंबईत भेट घेतल्याचे उघड झाले आहे. सोफी यांचे खलिस्तानी दहशतवाद्यासोबतचे छायाचित्र समोर आले आहे.

जामा मशिदीला भेट

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो आणि त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी येथील ऐतिहासिक जामा मशिदीला भेट दिली. या वास्तूच्या संकुलात त्यांनी जवळपास ३० मिनिटे पाहणी केली. त्रुडो यांनी बुधवारी अमृतसरला असताना सुवर्ण मंदिरालाही भेट दिली होती.