कित्येक दशकं लोटली. पानिपतच्या ऐतिहासिक जखमा बऱ्या झाल्या, पण व्रण तसेच राहिले. खानपान-राहणीमान बदलले, व्यवहाराची भाषादेखील बदलली; पण त्याउपरही मायमराठीचे प्रेम कमी झाले नाही. ही भावना आहे ज्योतिरादित्य यांची. हिंदी भाषिक राज्यात लौकिकदृष्टय़ा सिंदिया या नावाने ते ओळखले जातात. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या दिल्लीत झालेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मराठी पत्रकारांशी गाठ पडल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संवाद साधला. उच्चार हिंदी वळणाचे होते; पण शब्द अस्सल मराठी. मायमराठीशी आमचा अनुबंध जुना असल्याची भावना ज्योतिरादित्य यांनी व्यक्त केली.
ज्योतिरादित्यांचे वडील माधवराव मराठीप्रेमी होते. त्यांना मराठी उत्तम येत असे. मराठी माणूस भेटल्यावर त्याच्याशी मराठीतच बोलण्याचा त्यांचा आग्रह होता. तोच वसा आणि वारसा ज्योतिरादित्य पुढे चालवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्रात येणे होते. तेथील भागाशी आमचा अजूनही भावनिक बंध आहे. आमच्या घरात अजूनही मराठी भाषा शिकण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याचे ज्योतिरादित्य म्हणाले. राजेशाही लयास गेली असली तरी राजघराणे हयात आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे युवा नेते असलेले ज्योतिरादित्य लोकसभेत पक्षाचे चीफ व्हिप (मुख्य प्रतोद) आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला विरोधी पक्षांकडून सर्वप्रथम ज्योतिरादित्य शिंदे यांनीच बोलण्यास सुरुवात केली होती. घरात मराठमोळे वातावरण नसले तरी आम्ही मराठी बोलून ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही शब्द उमजत नाहीत; त्यासाठी तुमच्यासारखे भेटले, की त्यांना मराठीतूनच बोलण्याचा आग्रह धरतो, असे सांगून ‘भेटत राहा’, अशी विनंती ज्योतिरादित्य करतात. तुम्हाला भेटून बरं वाटलं. जेव्हा केव्हा भेटाल तेव्हा माझ्याशी मराठीतूनच बोला, असे म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य यांना भेटले की मराठी पातशाहीच्या खुणा अजून पुसल्या गेल्या नाहीत, याची मनोमन खात्री पटते. दिल्लीच्या हिंदी वर्चस्ववादी राजकारणात अशा उमद्या व प्रसन्न नेत्याकडून मायमराठीला लाभलेले हे राजसी सौंदर्य पाहून कुणीही दिल्लीकर मराठी माणूस क्षणभर का होईना, सुखावतोच!