अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर मंगळवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. यात २७ लोक ठार झाले तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला असून तालिबानने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्यांचा आकडा आताच निश्चित सांगू शकत नाही. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, आतापर्यंत तिघांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली.

एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, खासदारांची कार्यालये आणि सरकारी कार्यालये हल्लेखोरांच्या निशाण्यावर होती. एका आत्मघाती हल्लेखोराने पहिला बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर काही वेळातच त्याच ठिकाणी दुसरा बॉम्बस्फोट झाला, अशी माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सादिक सिद्दकी यांनी दिली. दरम्यान, जिवीतहानी आणि वित्तहानीची सध्या तरी माहिती उपलब्ध झालेली नाही. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती दिली. तीन जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, काबुल हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. तालिबानचा प्रवक्ता जैबुल्लाह मुजाहिद याने हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, आदल्या दिवशीच दक्षिण हेल्मांड प्रांतात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात ७ जण ठार झाले होते. सरकारी अधिकारी राहत असलेले अतिथीगृह हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती प्रांताचे पोलीस प्रमुख अघा नूर केमतोझ यांनी दिली होती. ठार झालेल्यांमध्ये नागरिकांसह जवानांचाही समावेश होता. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहितीही केमतोझ यांनी दिली. हेल्मांड येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी मात्र, कुणीही स्वीकारली नव्हती. पण हा हल्ला तालिबानने केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.