कंकर जिल्ह्य़ातील झलियामरी गावामध्ये असलेल्या आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारप्रकरणी छत्तीसगड सरकारच्या शिक्षण विभागातील दोघा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणी अटक झालेल्या व्यक्तींची संख्या ८ झाली असून त्यात दोघा शिक्षकांचा समावेश आहे.
विभागीय शिक्षणाधिकारी एस्. एस्. नवरजी आणि अतिरिक्त विभागीय शिक्षणाधिकारी जीतेंद्र कुमार नायक अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बलात्काराची घटना उघडकीस येवूनही दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात कुचराई केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राहुल भगत यांनी सांगितले की झलियामरी गावाचे उपसरपंच सुकलुराम यांनी नवरजी यांना आश्रमशाळेत घडलेल्या दुर्घटनेची माहिती दिली होती. तपासांती अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. मात्र यानंतरही दोषींवर नवरजी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर पोलिसांना कळविण्याचे सौजन्यही दाखवले गेले नाही, त्यामुळेच या दोघांना अटक झाली, असे भगत यांनी सांगितले.
छत्तीसगड सरकार संचालित वनवासी मुलींच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे ६ जानेवारी रोजी पुढे आले, त्यानंतर आश्रमशाळेतील शिक्षक आणि रखवालदार यांना ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेने राज्यभर असंतोष पसरला असून सरकारने सर्वच आश्रमशआळांमधील मुलींच्या सुरक्षेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.