पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखविरहित समाजाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, निश्चलनीकरणामुळे देश आधीच ‘रोखविरहित’ झाला असल्याची कोपरखळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिबल यांनी मारली.

भारत हा रोखविरहित समाज होण्याच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी संस्थात्मक रचना किंवा व्यवस्था असली, तरच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे सिबल म्हणाले. अशी काही व्यवस्थाच अस्तित्वात नसेल तर हे स्वप्न कसे खरे होईल, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

अशा दिशेने वाटचाल करण्यासाठी सरकारने राज्यांना तसेच विरोधी पक्षांना सोबत घेणे आवश्यक असल्याचे मत सिबल यांनी व्यक्त केले. लोकांनी मोबाइल बँकिंगचा वापर करावा, या मोदींच्या सूचनेबाबत ते म्हणाले की, बहुतांश लोक अशिक्षित आणि यंत्रांच्या वापराची सवय नसलेले आहेत, मग हे लोक मोबाइलच्या माध्यमातून व्यवहार कसे करतील?