आम आदमी पक्षाचा सिब्बल यांच्यावर आरोप
११ हजार कोटींच्या कर थकबाकीचे प्रकरण
देशाच्या विधी व न्याय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारून चार दिवस होत नाही तोच कपिल सिब्बलही आपल्या पूर्वसुरींप्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेले सिब्बल यांच्यावर ब्रिटिश कंपनी व्होडाफोनची बाजू घेतल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.
विधी व न्याय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच सिब्बल यांनी २४ तासांच्या आत व्होडाफोन-हचीसन यांच्या ११,२१७ कोटींच्या कर थकबाकीच्या प्रकरणी न्यायालयाबाहेर तडजोड करण्यास परवानगी देऊन त्यांचे पूर्वाधिकारी अश्वनीकुमार यांचा निर्णय बदलल्याचा आरोप केजरीवाल यांनी आज येथे केला. सिब्बल यांचे पुत्र अमित यांनी तीन वर्षे व्होडाफोन कंपनीची वकिली केल्याचा दावा त्यांनी केला. सिब्बल यांच्याशी याप्रकरणी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोपही केजरीवाल व ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केला. या सौदेबाजीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि अॅटर्नी जनरल गुलाम वहाणवटी यांच्याही भूमिकेवर केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह लावले.
नोव्हेंबर २०१० मध्ये अंदिमुथु राजा यांना टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकून राजीनामा द्यावा लागल्यानंतर दूरसंचार खात्याची सूत्रे कपिल सिब्बल यांच्याकडे सोपविण्यात आली. तोपर्यंत त्यांचे पुत्र अमित सिब्बल व्होडाफोनचे वकील होते. पण त्यानंतर त्यांनी हे प्रकरण हाताळण्याचे सोडून दिले, असा दावा करीत काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केजरीवाल यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधी व न्याय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम व्होडाफोन कंपनीवर मेहेरनजर केल्यामुळे सिब्बल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यूपीए-२ सरकारमध्ये आतापर्यंत वीरप्पा मोईली, सलमान खुर्शिद, अश्वनीकुमार या अपयशी विधी व न्याय मंत्र्यांपाठोपाठ आता सिब्बलही वेळ न दवडता वादग्रस्त बनले
आहेत.
विधी व न्याय मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच सिब्बल यांनी २४ तासांच्या आत व्होडाफोन-हचीसन यांच्या ११,२१७ कोटींच्या कर थकबाकीच्या प्रकरणी न्यायालयाबाहेर तडजोड करण्यास परवानगी देऊन त्यांचे पूर्वाधिकारी अश्वनीकुमार यांचा निर्णय बदलल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.