देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं अखेर आज बिगुल वाजलं आहे. 12 मे रोजी येथे मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे.

या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत. 4 कोटी 96 लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. मतदान ईव्हीएम मशिनद्वारेच होणार असून व्हीहीपॅट प्रणालीचाही वापर करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं. 56 हजार पोलींग बूथवर मतदान होणार असून मतदानादरम्यान दिव्यांगांसाठी आणि महिलांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे.  24 एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून 27 एप्रिल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

दक्षिण भारतात आता केवळ कर्नाटकमध्येच कॉंग्रेसची सत्ता असल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावला आहे. कॉंग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने कर्नाटक दौ-यावर आहेत, तर भाजपाकडून अमित शहा यांचं कर्नाटकवर बारीक लक्ष आहे. उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे.सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेत परतण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भाजपमध्ये तेथे चुरशीची लढत आहे.