वर्षाचे दिवस ३६५ असून त्यातील १०० दिवस सुट्ट्या आल्याने कर्नाटक सरकार काहीसे चिंतेत आहे. साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर शासकीय सुट्ट्या अशा मिळून शासकीय कामाला वर्षभरात १०० सुट्ट्या आहेत. या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी कॅबिनेटने सोमवारी एक समिती तयार केली आहे. इतक्या सुट्ट्या असताना सर्व कार्यालयीन कामकाज योग्य पद्धतीने होईल यासाठी या समितीने काही उपाय सुचवावेत असे सांगण्यात आले आहे. लोकांना सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही असे वाटते. मात्र अशाप्रकारे वर्षातून १०० सुट्ट्या असताना काम कसे करणार असा सवाल राज्य कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री कृष्ण बायरेगौडा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लोकांनी आरोप करताना या गोष्टींचा विचार करायला हवा असे ते म्हणाले.

राज्य सरकारकडून चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येते. त्यावर ते म्हणाले, आम्ही या सुट्टीच्या विरोधात नाही. मात्र सुट्ट्यांमध्ये कपात करण्याची आवश्यकता आहे. आता नेमक्या कोणत्या सुट्ट्या कमी करायच्या याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. सरकारतर्फे करण्यात आलेल्या समितीचा प्रमुख कोण असेल याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देतील असेही त्यांनी सांगितले. मात्र अशाप्रकारे जास्त सुट्ट्या असल्याने सरकारी कामात अडथळा येत असल्याचे मत बायरेगौडा यांनी नोंदवले.