आपल्याकडे राजकीय क्षेत्रात वाचाळवीरांची कमी नाही. अनेकदा हे वाचाळवीर बेजबाबदार विधान करून नसता वाद निर्माण करतात. कर्नाटकचे गृहमंत्री आर रामलिंगा रेड्डी यांनी महिलांसंदर्भात असेच वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले. मुळात महिलांना रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरण्याची गरजच काय आहे, असा सवाल त्यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान विचारला. साहजिकच यानंतर त्यांच्यावर टीका झाली आणि प्रसारमाध्यमांनी त्यांना या सगळ्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर रामलिंगा रेड्डी यांनी सुरूवातील या प्रश्नांना उत्तर द्यायचे टाळले.

रामलिंगा यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांना थेट माझ्या कार्यालयात या असे सांगितले. एका सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत रामलिंगा पुढे म्हणाले की, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या सुमारास एक महिला ऑफिसला जात असताना तिच्याबरोबर कोणीच नसल्याचे दिसते. अशावेळी तिच्याबरोबर तिच्या एखाद्या नातेवाईकाने असायला हवे होते. बंगळुरू शहराची लोकसंख्या १ कोटी २० लाख इतकी आहे. त्यामुळे प्रत्येकालाच सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

पाहा काय म्हणाले आहेत रामलिंगा…

याआधीही कर्नाटकचे माजी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही त्यांच्या कार्यकाळात झालेल्या एका सामूहिक बलात्कारप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करून असाच वाद ओढवून घेतला होता. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात अशा (बलात्कारासारख्या) घटना होत असतात, असे त्यांनी म्हटले होते.
तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी परदेशी महिलांनी भारतात तोकडे कपडे घालून फिरू नये, असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. यावरून त्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.