कर्नाटकात पाच मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले ६५ टक्के उमेदवार हे कोटय़धीश आहेत. अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हे उघड केले आहे.या निवडणुकीसाठी सहा पक्षांतर्फे २,९४८ उमेदवार उभे आहेत. त्यातील एक हजार ५२ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात ६८१ कोटय़धीश आहेत. या उमेदवारांची प्रत्येकी सर्वसाधारण मालमत्ता नऊ कोटीच्या घरात आहे.
हे कोटय़धीश उमेदवार सर्वच पक्षांचे आहेत. त्यात भाजप, काँग्रेस, जनता दल (निधर्मी), माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांची कर्नाटक जनता पार्टी, माजी मंत्री बी. श्रीमुलु यांची बीएसआर काँग्रेस, लोकसत्ता पार्टी तसेच पुन्हा तिकिट न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या आमदारांचा समावेश आहे.
सर्वाधिक मालमत्ता असलेल्या तीन उमेदवारांत काँग्रेसचे गोविंदराजनगर मतदारसंघातील उमेदवार प्रियकृष्णा (९१० कोटी), काँग्रेसचेच होस्कोट मतदारसंघातील एन. नागराजु (४७० कोटी) आणि बेल्लारी मतदारसंघातील काँग्रेसचेच अनिल लाड (२८८ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक म्हणजे ७७७ कोटी रुपयांची देणी असलेले उमेदवार प्रियकृष्णन् हेच आहेत.
या १०५२ उमेदवारांत एक लाख रुपयांपेक्षा कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या ६१ आहे. कर्नाटक जनता पार्टीचे आर. सत्यनारायण यांच्याकडे शून्य रुपयांची मालमत्ता आहे. लोकसत्ता पार्टीचे रायचूरचे उमेदवार रामण्णा आर. एच. जे. यांच्याकडे अवघी ९५० रुपयांची मालमत्ता आहे.