काश्मीरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून मोबाइल, इंटरनेट आणि लँडलाइन फोन सेवा बंद आहे. याच फटका फक्त सर्वसामान्य काश्मिरी जनतेलाच बसत नसून तिथे तैनात असलेल्या सुरक्षाबलाच्या जवानांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवानांना आपली खुशाली कुटुंबियांना कळवता येत नाहीय. श्रीनगरच्या झिरो ब्रिजच्या चेकपाँईटवर तैनात असलेले सीआरपीएफचे दोन जवान शेवटचे चार ऑगस्टला आपल्या कुटुंबियांसोबत बोलले होते.

कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. आता आठवडा होत आला आहे असे नाव न छापण्याच्या अटीवर सीआरपीएफच्या जवानाने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. अन्य जवानांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. झीरो ब्रीजपासून काही अंतरावर बाकडयावर बसलेला सीआरपीएफचा एका जवान तीन स्थानिक काश्मिरी मुलांसोबत बोलत होता.

इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधीने या जवानाशी संवाद साधला त्यावेळी त्याने मी सकाळी पाच वाजल्यापासून इथे उभा आहे. घरी फोन करण्याचा काही मार्ग आहे का? याबद्दल प्रत्येकाला विचारतोय. संध्याकाळी आम्ही आमच्या कॅम्पमध्ये परत जाऊ. इथे फोन काम करत नाहीय. प्रत्येकाची हीच तक्रार आहे असे या जवानाने सांगितले. हा जवान उत्तर प्रदेशचा आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पोलिसांना सुद्धा याच समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांना सुद्धा घरी फोन करता येत नाहीय. घरी काय चालू आहे ते आम्हाला समजत नाहीय असे या पोलिसाने सांगितले.