‘हैदर’ या चित्रपटातून काश्मीरमधील पुरातन सूर्यमंदिराबाबत विपर्यस्त सादरीकरण करण्यात आले आहे, असा आक्षेप विस्थापित काश्मिरी पंडितांच्या समितने घेतला असून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या चित्रपटातील ‘बिस्मील’ गाण्यातून काश्मीरमधील पुरातन मार्तण्ड मंदिर हा दैत्यांचा अड्डा असल्याचे चित्र रंगविण्यात आले आहे. या विपर्यस्त सादरीकरणामुळे केवळ काश्मीरमधील पंडितांच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत तर जगभरातील हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचली आहे, असे समितीचे अध्यक्ष विनोद पंडित यांनी म्हटले आहे.
या चित्रपटाच्या विरोधात समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली असून चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज, केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ आदींची छायाचित्र असलेली पोस्टर्सही जाळण्यात आली. या मंदिरात गाण्याचे चित्रण करणे आणि मंदिर हा दैत्यांचा अड्डा असल्याचे दर्शविणे या बाबी सहन न करता येण्यासारख्या आहेत. भारतीय पुरातत्त्व विभाग याला जबाबदार आहे, असेही समितीने म्हटले आहे.जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल प्रमाणपत्र मंडळ, चित्रपटाचे निर्माते, पुरातत्त्व विभाग आदींना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.