जम्मू- काश्मीरमधील कथुआ येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोटमधील न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले असून या निर्णयाचे पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे. “कथुआ प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा यासाठी पाठिंबा देणाऱ्या आणि काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे मी आभार मानते”, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सोमवारी कथुआमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पठाणकोटमधील न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. मुख्य आरोपी सांजी राम, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले. या निकालावर पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करते. या देशातील अनेक लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला. जम्मूृ- काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचेही मी आभारी आहे. अशा घृणास्पद गुन्हे रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे”, असे मुफ्ती यांनी सांगितले.

“देशातील बलात्कारांचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांना धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. लहान मुलीचा धर्म शोधण्याऐवजी त्यांच्यावर बलात्कार झाला हे चुकीचे आहे. या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये”, असे त्यांनी म्हटले आहे. हा खटला लढणारी महिला वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे देखील मी आभारी आहे. आता न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा दोषींना लाभ मिळू नये, त्यांना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.