संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका आरोपीचा वैद्यकीय अहवाल जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर सादर केला. या आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या या आरोपीचे वय २० वर्षापेक्षा जास्त असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. विशेष सरकारी वकिल जे.के.चोप्रा यांनी ही माहिती दिली.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेल्या परवेश कुमार उर्फ मन्नूची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ताजविंदर सिंह यांनी दिले होते. न्यायालयाला वैद्यकीय अहवाल देण्यात आला असून त्यावर अंतिम युक्तीवाद आज होईल त्यानंतर न्यायाधीश निकाल देतील असे चोप्रा यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर या घटनेची भीषणता समोर आली व संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. सर्वसामान्यांसह समाजातील अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन निषेध केला होता. आरोपींनी आठ वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केले.

मंदिराच्या परिसरात या मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारापूर्वी एका नराधमाने धार्मिक विधी केल्या. तर या प्रकऱणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने साथीदारांना मुलीची हत्येसाठी काही वेळ थांबा. मलाही तिच्यावर अत्याचार करायचे आहे, असे सांगितले होते, अशी माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी समोर आली होती. निवृत्त सरकारी अधिकारी संजी राम हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. संजी रामनेच बलात्कार आणि हत्येचा कट रचला. संजी रामने त्याच्या पुतण्याला मुलीचे अपहरण करायला सांगितले. पीडित मुलगी नेहमीच जंगलात चारा घेण्यासाठी यायची. १० जानेवारीला पीडित मुलगी चारा शोधत असताना रामच्या अल्पवयीन पुतण्याने तिला गाठले. त्याने पीडित मुलीला गप्पाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचा साथीदार मन्नूनेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ते पीडित मुलीला एका मंदिराच्या आवारात घेऊन गेले. तेथील प्रार्थनाकक्षात पीडितेला डांबून ठेवण्यात आले होते.