दिल्ली विधानसभा निवडणूक हा भारताचा अंतर्गत विषय आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे सुद्धा पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर केलेली टीका अजिबात खपवून घेणार नाही अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांना सुनावले.

चौधरी फवाद हुसैन हे भारताविरोधात बोलण्यासाठी ओळखले जातात. “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते माझे सुद्धा पंतप्रधान आहेत. दिल्ली निवडणूक भारताचा अंतर्गत विषय आहे. दहशतवाद्यांच्या प्रायोजकांचा हस्तक्षेप आम्ही अजिबात सहन करणार नाही” असे केजरीवाल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी, ते भारताच्या एकात्मतेला धक्का लावू शकत नाहीत असे आम आदमी पार्टीच्या प्रमुखांनी म्हटले आहे. युद्ध झाल्यास पाकिस्तानला हरवण्यासाठी दहा दिवस पुरेसे आहेत असे मोदी म्हणाले होते. त्यावर फवाद हुसैन म्हणाले की, भारतीयांनी मोदींच्या वेडेपणाचा पराभव केला पाहिजे.

आणखी एका राज्यात पराभूत होण्याच्या दबावामुळे ते हास्यास्पद दावे करत आहेत. ढासळती अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि काश्मीरसंबंधी अंतर्गत आणि बाहेरुन आलेल्या प्रतिक्रिया यामुळे मोदींचे संतुलन ढासळले आहे असे फवाद हुसैन म्हणाले होते.