करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आजही देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आहे. सध्याच्या घडीला अनेक राज्यांत लॉकडाउन कायम आहे. या खडतर काळात माणूस आपली जात-पात, धर्म-पंथ या सर्व गोष्टी विसरून माणूस म्हणून मदतीसाठी पुढे आलेला आपण सर्वांनी पाहिलं असेल. केरळमधील एका महिला डॉक्टरने सहा महिन्याच्या बाळाचा महिनाभर सांभाळ करत पुन्हा एकदा माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचं दाखवून दिलं. बुधवारी डॉ. मेरी अनिथा यांनी सहा महिन्यांच्या केल्विनला, त्याच्या आई-वडिलांकडे सोपवलं…त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते.

एल्विनचे पालक हे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातले रहिवासी आहेत. एल्विनचे पालक गेले काही महिने गुडगाव मध्ये एका हेल्थकेअर सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी एल्विनच्या वडिलांना करोनाची लागण झाल्यानंतर त्याची आई एल्विनला घेऊन केरळला परतली. कोचीला पोहचल्यानंतर एल्विनच्या आईने स्वतःला होम क्वारंटाइन केलं, मात्र यादरम्यान करोनाची चाचणी केली असता एल्विनच्या आईलाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. आपल्या लहान मुलालाही करोनाची लागण होईल या भीतीमुळे आई-वडिलांना एल्विनची चिंता होती. केरळमधील District Child Welfare Committee ने एल्विनचा सांभाळ करण्यासाठी कोणी तयार आहे का याचा शोध घेतला, परंतू करोनाच्या भीतीमुळे कोणीही त्याचा सांभाळ करण्यासाठी पुढे आलं नाही.

“१४ जून रोजी Child Welfare Committee ने मला एल्विनचा सांभाळ करण्याबाबत विचारलं. मात्र तोपर्यंत मला या प्रकरणाबद्दल समजलं होतं. एल्विनच्या आईचा करोना अहवाल येईपर्यंत तो तिच्यासोबतच राहत होता…त्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती होतीच. पण या गोष्टीचा फारसा विचार न करता मी लगेच एल्विनचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. याबाबत मी माझ्या परिवाराला माहिती दिली आणि त्यांनीही मला साथ दिली.” केरळमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. मेरी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. १५ जून रोजी डॉ. मेरी यांनी लहानग्या एल्विनला हॉस्पिटलमधून आपल्या ताब्यात घेतलं…आणि आपल्या घराजवळील एका फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत रहायला सुरुवात केली.

डॉ. मेरी यांना ३ मुलं आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना करोनाची लागण होऊ नये म्हणून मेरी यांनी महिनाभर एकटं राहणं पसंत केलं. मेरी यांच्या मुलांनाही यात आपल्या आईची साथ देत दररोज, आई आणि एल्विनसाठी जेवण तयार करुन घरापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली. गुडगाव आणि कोची अशा दोन वेगवेगळ्या शहरांत उपचार घेत असलेल्या एल्विनच्या आई-बाबांना डॉ. मेरी व्हिडीओ कॉल करुन त्यांच्या मुलाच्या तब्येतीविषयी माहिती द्यायच्या. महिन्याभराने उपचार घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर एल्विन आणि त्याच्या पालकांची भेट झाली. यावेळी एल्विनच्या पालकांनी डॉ. मेरी यांचे आभार मानले. “सध्याच्या खडतर परिस्थितीत कोणीही रुग्णांची काळजी घेण्यासाठी पुढे येत नाहीत. पण डॉ. मेरी देवासारख्या पुढे धावून आल्या, मी त्यांची कायम आभारी राहीन”, या शब्दांत एल्विनच्या आईने डॉ. मेरी यांचे आभार मानले.