सीबीएसई 10 वीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीचं प्रकरण अजून शमलं नसताना परीक्षेबाबत अजून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका विद्यार्थिनीसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश सीबीएसईला दिला आहे. केरळच्या कोट्टयम येथील अमिया सलिम या विद्यार्थिनीला गणिताच्या परीक्षेच्या दिवशी दोन वर्षांपूर्वीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याआधी अमिया सलिम हिच्यासाठी फेरपरीक्षा घेतली जावी असंही उच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितलं आहे.

12 मार्चपासून सीबीएसईच्या परीक्षा सुरू झाल्या आणि 28 मार्च रोजी गणिताचा पेपर झाला. गणिताच्या परीक्षेनंतर इतर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असताना इतरांपेक्षा आपल्याला वेगळी प्रश्नपत्रिका होती असं अमियाच्या लक्षात आलं. त्यानंतर अमियाने आणि तिच्या कुटुंबियांनी सीबीएसईच्या चेअरमन आणि रिजनल ऑफिसर यांच्याविरोधात तक्रार केली. त्यावेळी सीबीएसई बोर्डाकडून काहीही कारवाई झाली असा आरोप अमियाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.