केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत दोनजण ठार झाले असून, तमिळनाडूतील ३ मच्छिमारांसह चार मच्छिमार बेपत्ता आहेत. कासरगोड जिल्ह्य़ातील कुडुले येथे शनिवापर्यंत ३० सेंटीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

इडुकी या पर्वतीय जिल्ह्य़ातील कोन्नाथडी खेडय़ात शनिवारी सकाळी किरकोळ भूस्खलन झाल्याने पिकांचे नुकसान झाले, मात्र यात जीवहानी झाली नाही. लोकांनी पर्वतीय भागात प्रवास करू नये असा सल्ला त्यांना देण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

तिरुवल्ला येथे मणिमाला नदीत मासेमारी करत असताना घसरून कोशी वर्गीस (५३) हा बुडून मरण पावला, तर कोल्लम जिल्ह्य़ातील दिलीप कुमार (५४) यांच्या डोक्यावर नारळाचे झाड पडून मृत्यू झाला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्लाममधील नींडकरा येथून मासेमारीसाठी समुद्रात गेलेले तमिळनाडूचे ३ मच्छिमार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या बोटीतील इतर दोघे मात्र पोहून सुखरूप किनाऱ्याला लागले. फोर्ट कोची किनाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेला एक इसमही बेपत्ता आहे.

राज्याच्या उत्तर टोकावर असलेल्या कासरकोड जिल्ह्य़ात खबरदारीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी कुडुले येथे शनिवारी सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत ३०.६ सेंमी, तर होसदुर्ग येथे २७.७ सेंमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्य़ातील व्यावसायिक महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

नजीकच्या विळिंजम येथून बुधवारी समुद्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेले ४ मच्छीमार सुरक्षित परतल्यामुळे मोठा दिलासा मिळाला. या बेपत्ता मच्छिमारांच्या शोधासाठी ७ बोटींमधून २८ मच्छीमार रवाना झाले होते.