केरळमधला पत्रकार सिद्दीक कप्पन याला मथुरा कारागृहातून दिल्लीला उपचारासाठी हलवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा मथुरा कारागृहात हलवण्यात येणार आहे. सिद्दीक कप्पन याला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती.

सिद्दीक याच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. उत्तरप्रदेश सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सिद्दीक याच्या जामीनाचा विरोध केला आहे.

गेल्या वर्षी हाथरसमधील दलित महिलेवर सामूहुक बलात्कार प्रकरणाबद्दल माहिती घ्यायला जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर यूएपीए या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासंदर्भातल्या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. कप्पन हा खोटं ओळखपत्र घेऊन हाथरसला जात असल्याचंही समोर आलं होतं. हे ओळखपत्र तेजस या वर्तमानपत्राचं होतं. मात्र हे वर्तमानपत्र तीन वर्षांपूर्वीच बंद झाल्याचं समोर आलं होतं.

तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं होतं की, हे वर्तमानपत्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं मुखपत्र आहे. या वर्तमानपत्राने ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा केला होता. कप्पन या संघटनेचा सक्रिय सदस्य असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.