जालंधर प्रांताचे बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननला वेश्या म्हणणाऱ्या केरळमधील अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावला आहे. २० सप्टेंबरपर्यंत त्यांना महिला आयोगापुढे हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. मात्र, महिला आयोगाच्या समन्सनंतरही आमदार जॉर्ज आपल्या विधानावर ठाम आहेत. इतकंच नाही तर कोणत्याही महिला आयोगाला माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननला वेश्या म्हटल्यानंतर जॉर्ज यांच्यावर सोशल मीडियासह चौफेर टीका होत आहे. मात्र विधानावर माफी मागण्याऐवजी त्यांनी मी माझ्या विधानावर ठाम आहे, ती नन जाणीवपूर्वक चर्चची बदनामी करत आहे, असं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही महिला आयोगाला माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण –
जून महिन्यात एका ननने बिशप मुलक्कल यांच्यावर आरोप करताना, केरळजवळील कोट्टायम येथील एका कॉन्व्हेंटमध्ये २०१४ ते २०१६ दरम्यान वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलं होतं. याबाबत बोलताना आमदार पी. सी. जॉर्ज म्हणाले, ‘ती नन वेश्या आहे यामध्ये कोणालाही शंका नाहीये. १२ वेळेस तिने मजा घेतली आणि १३ व्यांदा हा बलात्कार कसा झाला? जेव्हा पहिल्यांदा बलात्कार झाला होता, तेव्हाच तिने तक्रार का केली नाही?’

पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कारवाई केली जावी यासाठी तिच्या सहकारी असलेल्या पाच नन आणि अन्य संघटनांनी केरळ उच्च न्यायालयासमोर शनिवारी धरणे धरले होते. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय ताकदीचा वापर करुन आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांना वाचवलं जात आहे, पण आमची बाजू मांडायला कोणीही नाही असा आरोप त्यांनी केला आहे.