ब्लू व्हेल या ऑनलाईन गेममुळंच माझ्या मुलानं आत्महत्या केली. ‘ब्लू व्हेल’नंच माझ्या मुलाचा जीव घेतला, असा दावा गेल्या महिन्यात आत्महत्या केलेल्या १६ वर्षांच्या मुलाच्या आईनं पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केला आहे. मुलाच्या आईनं तक्रार केली असली तरी याबाबतची शक्यता तपासली जाईल. तसंच चौकशी करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

तिरुवअनंतपुरम येथील मनोज सी. मनू या १६ वर्षांच्या मुलानं गेल्या महिन्यात (२६ जुलै) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रेमसंबंधातून नैराश्य आल्यानं आणि आई रागावली म्हणून मुलानं जीवनयात्रा संपवली असावी, असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं होतं. पण आता या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. ब्लू व्हेलमुळे मनोजनं आत्महत्या केली, असा संशय त्याच्या आईनं व्यक्त केला आहे. तशी तक्रार तिनं पोलिसांत दिली आहे. अलिकडेच ब्लू व्हेल गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांबाबत माध्यमांतून माहिती मिळाल्यानंतर मनोजच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. ब्लू व्हेलचं टास्क पूर्ण करताना मुलं आत्महत्या करतात. या दरम्यान ते स्वतःला इजाही करून घेतात, असं आढळून आलं आहे. पण मनोजच्या शवविच्छेदन अहवालातून अशी कोणतीही बाब स्पष्ट होत नाही. या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ब्लू व्हेलमुळे आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेनं तपास करण्यात येत आहे. त्याचा मोबाईल आणि कॉम्प्युटरची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.