देवयानी खोब्रागडे प्रकरण हे उद्वेगजन्य होते यात शंकाच नाही. मात्र हे प्रकरण आता अधिक ताणले जाऊ नये. अमेरिकेनेही यावर ‘सन्मान्य राजकीय तोडगा’ काढण्याची गरज आहे. मात्र अशी प्रकरणे भारताचे मत विचारात न घेता पुढे नेता येणार नाहीत, याचे भानही त्यांनी बाळगावे, असे मत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले.
भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकारी महिलेसंदर्भात असे प्रकरण घडते आणि तरीही भारताने त्याकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा बाळगली जाते, हेच आक्षेपार्ह आहे. तेथील न्याययंत्रणेनेही याप्रकरणी याचिका फेटाळून लावत अमेरिकेच्या प्रशासनाला या प्रकरणाची गुंतागुंत अधिक न वाढविण्याची संधी दिली होती, मात्र ही संधी या प्रशासनाने गमावली आहे, अशी टीका खुर्शीद यांनी केली. याच दृष्टीने अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्याशी झालेल्या भेटीत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटींद्वारे या समस्येवर तोडगा काढावा आणि यापुढे असे प्रसंग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे ठरल्याची माहितीही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दरम्यान, एकदा अमेरिकी प्रशासनाची मागणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणी पुन्हा एकदा नव्याने आरोपपत्र दाखल केले असून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
हे प्रकरण उद्भवल्यापासून परराष्ट्र मंत्री या नात्याने आपली भूमिका कायम आहे. जे घडले ते आक्षेपार्ह आणि अयोग्यच होते. त्याचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र हे प्रकरण अधिक ताणले जाऊ नये आणि भारत- अमेरिकेच्या व्यापक संबंधांवर त्याचा परिणाम होऊ नये, अशी आपली अपेक्षा आहे.
सलमान खुर्शीद, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
प्रकरण नेमके काय?
भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी आपल्याकडे घरकामासाठी एका महिलेला भारतातून बोलावून घेतले. मात्र तिला वेतन देताना, अमेरिकेतील किमान वेतनाच्या कायद्याचा तसेच तिच्याशी केलेल्या करारपत्राचा भंग केला. प्रत्यक्षात ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मानधन म्हणून सदर महिलेस दिली गेली आणि कामासाठी नेमून दिलेल्या कमाल साप्ताहिक तासांच्या मर्यादेचेही त्यांनी उल्लंघन केले, असा आरोप खोब्रागडे यांच्यावर केला जातो. तर, एका परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याला ज्या सन्मानाने आणि ज्या संरक्षणात वागवले जावे, असे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत त्यांचा अमेरिकेने भंग केला आणि खोब्रागडे यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आक्षेप भारताकडून घेतला जातो.