पाकिस्तानच्या आदिवासी पट्टय़ात दहशतवाद्यांच्या एका गटाने एक महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या शीख व्यक्तीचा शिरच्छेद केला आहे. सदर शीख व्यक्ती विरोधी गटासाठी हेरगिरीचे काम करीत असल्याचा आरोप करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
या व्यक्तीचे नाव मोहिंदर सिंग (४०) असे असून त्यांचे खैबरमधील तब्बई गावातील त्याच्या दुकानातून २० नोव्हेंबर रोजी काही सशस्त्र अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. सिंग यांचा हर्बल औषधे विकण्याचा व्यवसाय असून पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील शीख समुदायाचा हा प्रमुख व्यवसाय आहे.
सिंग यांचा शिरच्छेद करून त्यांचा मृतदेह एका पिशवीत भरून तो झकाखेल बाजार विभागात फेकून दिल्याचे ‘डॉन’ वृत्तपत्राने एका निनावी अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे. तवहिदूल इस्लाम या दहशतवादी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्कर-ए-इस्लाम या प्रतिस्पर्धी गटासाठी हेरगिरी करीत असल्याने सिंग यांची हत्या करण्यात आली, अशी चिठ्ठी मृतदेहाजवळ सोडण्यात आली होती.
ही हत्या अमानुष असल्याचे सिंग यांचा भाऊ दसवंत सिंग यांनी म्हटले आहे. आम्ही गेल्या सहा दशकांपासून येथे वास्तव्यास असून आमचे कोणाशीही वैर नाही, अल्पसंख्य शीख समाजाविरोधातील हे निंदनीय कृत्य आहे, असेही ते म्हणाले.
सिंग यांच्या पश्चात पत्नी आणि नऊ मुले आहेत. सरकारने अल्पसंख्याकांचे रक्षण करावे आणि कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सिंग यांच्या भावाने केली आहे.