आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर अस्वस्थ झालेले तेथील मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी सकाळी राजीनामा दिला. रेड्डी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असल्यामुळे पक्षापुढील अडचणीत वाढ झाली आहे.
रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता मंगळवारीच वर्तविण्यात आली होती. बुधवारी सकाळी त्यांनी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. रेड्डी आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याला कॉंग्रेस पक्षातील रेड्डी यांचा पहिल्यापासून विरोध आहे. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याचे विधेयक तेथील विधानसभेकडे पाठविल्यानंतर ते परत पाठविण्यामध्ये रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्व पार्श्वभूमीवर रेड्डी राजीनामा देणार, हे स्पष्ट होते. मात्र, रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसपुढील अडचणीत वाढ झाली आहे.