रोड रोमियोविरोधी मोहिमेवर टीका करताना भगवान कृष्णबद्दल शेरेबाजी करुन नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या प्रशांत भूषण यांनी अखेर मंगळवारी माफी मागितली. माझ्या ट्विटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. यासाठी मी माफी मागतो असे ट्विट करत प्रशांत भूषण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर प्रदेशात रोड रोमियोविरोधी मोहीमेवर टीका करताना प्रख्यात वकील आणि राजकारणी प्रशांत भूषण यांनी रविवारी वादग्रस्त ट्विट केले होते. ‘रोमियोने फक्त एका स्त्रीवर प्रेम केले. पण कृष्ण तर अनेक महिलांसाठी प्रसिद्ध होता. आता रोड रोमियोविरुद्ध मोहीम राबवणाऱ्यांना कृष्णविरोधी पथक म्हणण्याची योगी आदित्यनाथांची हिंमत आहे का ?’ असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारला होता. या वादग्रस्त ट्विटवरुन प्रशांत भूषण यांच्यावर टीका सुरु झाली होती. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तजिंदर पाल बग्गा आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रवक्ते झीशान हैदर यांनी लखनौत पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती.

प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसताच मंगळवारी प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन माफी मागितली. अँटी रोमियो पथक आणि कृष्णबद्दलच्या माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ निघाला. यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासाठी मी सर्वांची माफी मागतो आणि ते ट्विट डिलीट करतो असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

रविवारीदेखील प्रशांत भूषण यांनी ट्विटवर स्पष्टीकरण दिले होते. आपल्या ट्विटचा विपर्यास करण्यात आला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे त्यांनी सांगितले होते. लहानपणापासून कृष्ण हा गोपींना छेडत असल्याचे ऐकत आपण वाढलो. रोमियो पथकाच्या तर्कानुसार कृष्णाचे हे कृत्य गुन्हा ठरते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मी धार्मिक नाही. पण माझी आई धार्मिक आहे. आमच्या घरात राधाकृष्णचे चित्रही आहे असे सांगत त्यांनी घरातील फोटोदेखील ट्विटरवर शेअर केला होता.