आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सध्या भारताचे नागरिक कुलभुषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या वकिलांनी वापरलेल्या अभद्र भाषेवर भारताच्या हरिश साळवे यांनी आक्षेप नोंदवत चांगलेच खडसावले. अशा अभद्र भाषेवरवर आळा घालण्यासाठी लक्ष्मणरेषा आखावी, अशी विनंती साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली आहे.

सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी भारतातर्फे पाकिस्तानच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यात आला. मंगळवारी सुनावणीदरम्यान पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी वापरलेल्या अभद्र भाषेकडे साळवे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, या न्यायालयात पाकिस्तानकडून जी भाषा वापरण्यात आली ती पाहता, या न्यायालयाने लक्ष्मणरेषा आखायला हवी. खावर कुरेशी यांनी पाकिस्तानची बाजू मांडताना शेमलेस (निर्लज्ज), नॉनसेन्स (मूर्खपणा), डिस्ग्रेसफुल (लज्जास्पद) अशा शब्दांचा वापर केला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात अशाप्रकारच्या अभद्र शब्दांचा वापर करण्यावर भारत आक्षेप घेत आहे.

(आणखी वाचा : Timeline: जाणून घ्या कोण आहेत कुलभूषण जाधव आणि काय आहे हे प्रकरण)

नवीन हंगामी न्यायधीशांची निवड करण्यासाठी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी स्थगित करावी ही पाकिस्तानने केलेली विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढलेला असताना सोमवारपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असलेल्या द हेगमध्ये जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. बुधवारी भारताला आपला अंतिम युक्तिवाद करण्यासाठी ९० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. आज सुनावणीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय एप्रिल किंवा मे महिन्यात देण्याची अपेक्षा आहे.