जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले असून एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. एक सीआरपीएफचा जवान आणि दोन पोलीस शहीद झाले. कुपवाडयाच्या बाबागंद भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घातला व शोधमोहिम सुरु केली.

ही शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. बराचवेळ गोळीबार थांबला होता. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान घराच्या दिशेने गेल्यानंतर दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यामध्ये तीन जवान शहीद झाले. चकमकस्थळाच्या ठिकाणी सुरक्षा पथक आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षात चार जण जखमी झाले. अजूनही या ठिकाणी चकमक सुरु आहे.