आपण पाऊस कधी पडणार, थंडी कधी पडणार याच्याच चिंतेत सतत असतो. पण जगात अशाही काही जागा आहेत जिकडे पाऊस पडलाच तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा. अशा ठिकाणी अधिक दिवस हे उन्हाचेच असतात. पण उन्हाची पातळी सहन करण्याच्या पलीकडे वाढली तर?
संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान खात्याने कुवेतचे तापमान ५४ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याचे नोंदवले. आशिया खंडातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान म्हणून याची नोंद झाली आहे.
जागतिक हवामान संघटनेनुसार कुवेतमध्ये गेल्या काही दिवसांत ५४ अंश सेल्सियस एवढे तापमान होते. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकाच्या काही भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून उष्णता जास्त वाढली आहे. मुळात या भागात उष्णता ही जास्तच असते. पण, गेल्या काही दिवसांपासून याचे प्रमाण काही टक्क्यांनी वाढले आहे.
जागतिक हवामान संघटनेनुसार जगातले सर्वाधिक तापमान १९१३ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये ५६.७ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले होते. पण यावर वाद सुरू असल्यामुळे सध्या तरी सर्वाधिक तापमान यासाठीचा जागतिक विक्रम कुवेतच्याच नावे होणार अशी चिन्ह आहेत.
जागतिक तापमानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे ही खरी तर चिंतेची बाब आहे. बर्फाचे वितळणे, समुद्राचे पाणी वाढणे, अवेळी पाऊस पडणे यासारखे प्रकार असेच चालू राहिले तर भविष्यात फार मोठ्या समस्यांना सगळ्यांनाच सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2016 रोजी प्रकाशित
आशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाहूनच घाम फुटेल!
संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान खात्याने कुवेतचे तापमान वाढले
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-07-2016 at 15:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuwait experiences the highest temperature with world under heat waves