बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनचे नेते आपल्या आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र काही ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना लोकांचा विरोध सहन करावा लागत आहे. असाच एक प्रकार लखीसराय जिल्ह्यात पहायाला मिळाला. बिहार सरकारमधील मंत्री असणारे विजय सिन्हा यांच्याविरोधात स्थानिकांनी घोषणाबाजी केली. सिन्हा हे प्रचारासाठी तरहारी गावामध्ये गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे सिन्हा याच मतदारसंघातून आमदार आहेत.

सिन्हा यांच्या कामाबद्दल मतदारसंघात खूपच आक्षेप आहे. सिन्हा हे मत मागण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये पोहचले तेव्हा लोकांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. गावकऱ्यांनी मंत्र्यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही गावकऱ्यांनी रागाच्याभरात मंत्र्याला शिवीगाळ केल्याचे दिसत आहे. मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला समर्थकांनी सुरक्षा कडं केलं. मात्र केवळ घोषणाबाजीने राग शांत न झाल्याने गावकऱ्यांनी मंत्र्यांवर थेट शेण फेकून मारल्याचंही न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

व्हिडीओ सौजन्य : न्यूज १८ व्हायरल्स

या सर्व प्रकारामुळे सिन्हा यांनी प्रचार अर्ध्यात सोडून गावातून काढता पाय घेतला. समर्थकांच्या मदतीने गावकाऱ्यांपासून सुटका करुन घेत सिन्हा त्या गर्दीतून बाहेर पडले. यासंदर्भात नंतर प्रसारमाध्यमांनी विचारले असता सिन्हा यांनी या प्रकारासाठी विरोधकांना दोषी ठरवलं आहे. विरोधकांनी हा आपल्याविरोधात केलेला कट असल्याचे सिन्हा म्हणाले.