चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या मदतीसाठी पक्षाचे कार्यकर्ते तुरुंगात पोहोचले आहेत. चोरीच्या गुन्ह्याखाली राजदच्या दोन कार्यकर्त्यांना अटक झाली असून तुरुंगांत लालूंपर्यंत पोहोचता यावे यासाठी त्यांनी हा कथित गुन्हा केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मदन यादव आणि त्याचा साथीदार लक्ष्मण यादव या दोघांना रांची पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या दोघांवर सुमित यादव या तरुणाकडील १० हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात उघड झालेली माहिती मात्र चक्रावून टाकणारी आहे. मदन यादव या सधन कुटुंबातील आहे. त्याचे अलिशान घर असून त्याच्याकडे एसयूव्ही कारदेखील आहे. हे दोघेही राजदचे कार्यकर्ते असून लालूंचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे हे दोघे १० हजार रुपयांची चोरी करतील का, असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.

तुरुंगात लालूंपर्यंत पोहोचता यावे आणि तिथे लालूंची मदत करता यावी यासाठी त्यांनी स्वतःला गुन्ह्यात अडकवले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी २३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल झाली त्यावेळी पोलिसांना संशय आला नाही. मात्र, दोन्ही आरोपी न्यायालयासमोर शरण आल्याने शंकेची पाल चुकचुकली. न्यायालयाने दोघांनीही न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांना बिरसा मुंडा केंद्रीय कारागृहात पाठवण्यात आले. याच तुरुंगात लालूप्रसाद यादवही आहेत. यात भर म्हणजे मदन यादवला ओळखणाऱ्या मंडळींनीही तो चोरीचा गुन्हा का करेल असा प्रश्न उपस्थित केला. मदन हा चांगल्या कुटुंबातील आहे, मग तो १० हजार रुपयांची का करेल, असा प्रश्न मदनला ओळखणाऱ्या एका चहाविक्रेत्याने उपस्थित केला. दोन्ही आरोपी हे राजदचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तक्रार दाखल करण्याचे उद्देश नेमके काय होते, लालूंच्या दिमतीसाठी तुरुंगात जाता यावे यासाठी दोघांनीही स्वतःविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. राजदच्या प्रवक्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोघे तुरुंगात कसे गेले याचा पोलिसांनी तपास करावा, लालूंनी कार्यकर्त्यांना तुरुंगात यायला सांगितलेले नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते शक्तिसिंह यादव यांनी दिली.