तवांग जिल्ह्य़ातील घटना, दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस
अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस व दरडी कोसळल्याने तवांग जिल्ह्य़ात कामगार छावणीला फटका बसून १६ जण ठार झाले आहेत. पहाटे तीन वाजता तवांग शहरापासून ६ कि.मी. अंतरावर फामला खेडय़ात काही कामगार बांधकाम करीत असताना ही घटना घडली असून ढिगाऱ्याखालून १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गंभीर जखमींना तेझपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिस अधीक्षक अँटो अल्फॉन्से यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. लष्कर, पोलिस व नागरी प्रशासनाने मदतकार्य केले असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा नवीन लेब्रांग व सरकारी शाळा दरम्यानचा रस्ता दरडी कोसळल्याने बंद झाला आहे. निवासी इमारतींचेही यात नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणहानीबाबत दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाइकांच्या वेदनेत सहभागी असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दरडी कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील प्राणहानीबाबत दु:ख व्यक्त केले. काँग्रेस आमदार, प्रदेशाध्यक्ष यांना मदतकार्यात हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.