नासातर्फे कायमच अवकाशातील आणि पृथ्वीवरीलही काही फोटो प्रसिद्ध करण्यात येतात. नुकतेच नासाने असेच काही फोटो प्रसिद्ध केले असून त्यातील सर्वाधिक फोटो हे भारताचे आहेत. आता या फोटोंमध्ये असे काय विशेष आहे ज्यामुळे हे फोटो मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. तर भारताचा अवकाशातून फोटो घेतला असून यामध्ये देशाच्या अनेक भागांत आगीचे लोण पसरल्याचे दिसत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांचा समावेश आहे. हे फोटो मागच्या १० दिवसांतील आहेत असेही सांगण्यात आले आहे. आता ही आग कुठे लागली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, सर्वाधिक भागात जंगल असल्याचं म्हटलं जात आहे. लाल ठिपक्यांनी नासाच्या फोटोत हा भाग आपल्याला दिसू शकतो.

विविध भागांत लागलेल्या आगींमुळे वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. तसेच याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवरही झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा लाल ठिपक्यांचा भाग जंगलाचा असल्याचे म्हटले जात असतानाच ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. वैज्ञानिकांच्या मते, आगीचे लोण दिसत असलेल्या सर्वाधिक भागात शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळवणं अतिशय अवघड गोष्ट असते. तसेच, या आगीमुळे वातावरणात सर्वत्र धुराचे लोळ पसरतात. मात्र असे काहीच झालेले दिसत नसल्याने ही आग शेतात लागली असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

फोटोत ज्याठिकाणी लाल रंगाचे ठिपके दिसत आहेत, त्याठिकाणी तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन होते. त्यामुळे पिकांच्या कापणीनंतर पिकांचा खालचा भाग मुळासकट काढून टाकण्यासाठी याठिकाणी शेतकऱ्यांकडून आग लावली जाते. हरियाणा आणि पंजाबसह देशाच्या इतर भागातही ही पद्धत प्रचलित आहे. मात्र या आगीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आता नासातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे हे नक्की.