Adhaar Card आणि Pan Card लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातल्या अनेक नागरिकांना हे करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदत अजून वाढवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर केंद्र सरकारने ही मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांना आज Adhaar-Pan Link करता आलेले नाही, त्यांना ३० जूनपर्यंत ते करता येणार आहे.

करोना परिस्थितीमुळे वाढवली मुदत

करोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोविड-१९च्या काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन तर काही भागांमध्ये कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सामना कराव्या लागत असलेल्या परिस्थितीमध्ये ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याचं आयकर विभागाकडून ट्वीट करून जाहीर करण्यात आलं आहे.

 

आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश

Adhaar Card आणि Pan Card लिंक करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक व्यक्तींनी एकाच वेळी वेबसाईट विझिट केल्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर आपल्या अडचणी शेअर देखील केल्या होत्या.

Aadhaar PAN Linking: ‘सरकारने आधी आयकर विभागाची वेबसाईट नीट चालवावी’; साईट क्रॅश झाल्याने सर्वसामान्य संतापले

SMS चा होता पर्याय

दरम्यान, संकेतस्थळावर समस्या येत असताना SMS च्या माध्यमातून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याचा पर्याय सुरू होता. यामध्ये ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत म्हणजेच आधार आणि पॅनशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुन एसएमएस पाठवून आधार आणि पॅन लिंक करण्याची सुविधा उपलब्ध होती. लिंक करण्यासाठी…

UIDPAN<SPACE><12 Digit Aadhaar Number><SPACE><10 Digit PAN>

असा मेसेज पाठवण्याची विनंती आयकर विभागाकडून करण्यात आली होती. दरम्यान, आता ही मुदत (last date to link aadhaar to pan) वाढवून दिल्यामुळे ज्यांचं लिंकिंग आज होऊ शकलं नाही, त्यांना दिलासा मिळाला आहे.

एका SMS वर लिंक करु शकता Aadhaar आणि PAN; जाणून घ्या नेमकं कसं?