काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यासह अन्य विरोधीपक्षांच्या नेत्यांना श्रीनगर विमानतळावर अडवल्या गेल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले आहे की, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सामान्य नाही. तर व्हिडिओमध्ये ते अधिकाऱ्यांना आम्हाला राज्यपालांनी बोलवले असल्याने आम्हाला जाऊ द्यावे असे सांगताना दिसत आहे. मात्र राहुल गांधी आणि विरोधीपक्षांच्या प्रतिनिधी मंडळास विमानतळावरूनच परतावे लागले होते.

राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या लोकांचे स्वातंत्र्य व नागरी हक्कांवर गदा आणल्याच्या घटनेला आता २० दिवस पूर्ण झाले असून, या काळात येथील प्रशासनाने विरोधीपक्ष व प्रसार माध्यमांची केलेली मुस्कटदाबी व बळाचा क्रूर वापर याचा अनुभव आम्हालाही श्रीनगर येथील कालच्या भेटीत आला. शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली.

राहुल गांधींनी या व्हिडिओत  हे देखील म्हटले आहे की, जर जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असेल तर मग आम्हाला का अडवले जात आहे? जर कलम १४४ लागू असेल तर मी एकटा जाण्यास तयार आहे. आम्ही नागरिकांची चौकशी करू इच्छित आहोत. मात्र आम्हाला विमानतळाबाहेरच जाऊ दिले जात नाही. यावरूनच हे स्पष्ट होते की येथील परिस्थिती सामान्य नाही.

शनिवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळाबाहेर येण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर तासाभरातच या शिष्टमंडळाला दिल्लीला माघारी पाठवून देण्यात आले.

यावेळी राहुल गांधी यांच्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी राजा, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, द्रमुकचे त्रिची शिवा, राजद चे मनोज झा, जेडीएसचे के डी कुपेंद्रा रेड्डी व मजीद मेमन यांची उपस्थिती होती.