कनिष्ठांच्या जीवावर कामकाजाचा भार टाकून आराम करणाऱ्या वरिष्ठांची संख्या कमी नाही. अनेक क्षेत्रांमध्ये कनिष्ठ पदावरील व्यक्तींना असे अनुभव येत असतात. असाच अनुभव पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाला आला. वरिष्ठ वैमानिकाने इस्लामाबाद-लंडन यात्रेदरम्यान ‘डुलकी’ घेतल्याने विमानाची जबाबदारी प्रशिक्षणार्थी वैमानिकावर आली. त्यामुळे विमानातील ३०५ प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचा वरिष्ठ वैमानिक अमीर अख्तर हाश्मी तब्बल अडीच तास बिझनेस क्लास केबिनमध्ये झोपला होता. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत विमानाची जबाबदारी प्रशिक्षणार्थी वैमानिकावर होती. विमानाने उड्डाण करताच अमीर अख्तर हाश्मी झोपायला गेला. एप्रिलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याचे वृत्त ‘द डॉन’ने दिले आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने सुरुवातीला हाश्मीविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली. हाश्मी पाकिस्तान एअर लाईन्स पायलट्स असोसिएशनचा माजी अध्यक्ष असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने टाळाटाळ केल्याचे वृत्त द डॉनने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. ‘हाश्मी यांना विमानाचे उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे,’ अशी माहिती पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रवक्ते दयाल गिलानी यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
२६ एप्रिलला इस्लामाबादहून लंडनला जाणाऱ्या पीके-७८५ विमानाची जबाबदारी हाश्मी यांच्यासह अली हसन याझदानी यांच्याकडे होती. हाश्मी यांना प्रशिक्षणार्थी वैमानिकांना विमान चालवण्याचे धडे देण्यासाठी महिन्याकाठी १ लाख रुपयांहून अधिक पगार मिळतो. त्यामुळे हाश्मीने विमानाने उड्डाण केल्यानंतर अलीला सूचना देणे अपेक्षित होते. मात्र हाश्मीने कामचुकारपणा करत झोप काढणे पसंत केले. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे.