श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून त्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर तेथे निर्बंध लागू असून या वातावरणात सशस्त्र दहशतवाद्यांनी  लोकांना प्रशासनाचे आवाहन झुगारून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन भित्तिपत्रकांद्वारे केले आहे. ठिकठिकाणी भिंतीवर पत्रके लाववण्यात आली असून काहीवेळा प्रत्यक्ष परिसरात फिरून काही जण लोकांना धमकावत आहेत.

दुकानांच्या प्रवेशद्वारावर चिकटपट्टय़ा लावण्यात येत आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी याबाबत मौन बाळगले आहे कारण त्यांच्याकडे याबाबत अधिकृत तक्रारी करण्यात आलेल्या नाहीत. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ दहशतवादी दुकाने बंद पाडत आहेत. ठिकठिकाणी पत्रके लावत आहेत. त्यात काही हाताने लिहिलेली, तर काही टंकलिखित आहेत. बाजारपेठा, मशिदी व इतर भागात दहशतवादी, लोकांनी काय करावे व काय करू नये हे सांगत आहेत. सशस्त्र दहशतवादी काश्मीर खोऱ्यात फिरत असून लोकांना दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडत आहेत.

दक्षिण काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर बँकेत घुसून दहशतवाद्यांनी कर्मचाऱ्यांना कामापासून दूर राहण्यास सांगितले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्य़ात मोड्रीगाम येथे खेडय़ात दहशतवाद्यांनी दुकाने सीलबंद केली. सीलवर हिज्बुल मुजाहिद्दीनचा शिक्का आहे.

श्रीनगरमधील सिव्हील लाइन्स भागात ‘एल डब्ल्यू’ असा शिक्का दुकानांवर मारला आहे, त्याचा अर्थ ‘लास्ट वॉर्निग’ असा आहे. दोन दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवल्याने त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. एका दुकानदाराने सांगितले की, आम्ही दुकाने उघडू इच्छितो पण सुरक्षेची हमी नाही, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सगळे सांगितले पण काहीच मार्ग निघाला नाही. पोलीस निष्क्रिय आहेत ते खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत असेही दुकानदाराने म्हटले आहे.

मध्य काश्मीरमध्ये गंदेरबल येथे व श्रीनगरमधील फतेहकदल येथे अल  बदर या संघटनेने पोलिसांच्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्काराचे फर्मान काढले आहे.  श्रीनगरच्या बेमिना बझार भागात मुसा बाबा गटाने पत्रके लावली असून ती इंग्रजीत आहेत, त्यात दुकानदारांनी सकाळी ८.३० पर्यंतच वस्तू विकून दुकाने बंद करावीत असे म्हटले आहे. अशी भित्तिपत्रके लावली गेल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.