संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अखंड आंध्रप्रदेशचे समर्थन करणाऱया सदस्यांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर सरकारने तेलंगणा विधेयक संसदेच्या विधीपटलावर सादर केले आणि संसदेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला.
संसदेचे कामकाज ठप्प व्हावे यासाठी अखंड आंध्रप्रदेशच्या समर्थकांनी चक्क ‘पेपर स्प्रे’ संसदेत मारण्यास सुरूवात केली. या गोंधळात हाणामारीचाही प्रकार घडला अनेक सदस्य जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, काही सदस्यांनी चक्क चाकूचा धाक दाखविण्यास सुरूवात केल्याचे केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी सांगितले.
याप्रकारानंतर संसदेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेत प्रेपर स्प्रे आणि हाणामारीचा प्रकार करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी सांगितले.
तसेच आज संसदेत घडलेला प्रकार खेदजनक असल्याचे म्हणत लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी यांनी अधिनियम ३७४ अंतर्गत घटनेला कारणीभूत ठरलेल्या एकूण १७ सदस्यांना निलंबीत केले आहे. 
गेल्या बुधवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यापासून सातत्याने तहकूब करावे लागते आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशमधील सदस्यांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्याचे प्रकार सुरूच ठेवल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागते आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारीला संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होण्यापूर्वी वेगळ्या तेलंगणाचे विधेयक संसदेमध्ये मांडले जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे.