मुंबईपासून ते मंदसौरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु असतानाच हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांनी कर्जमाफी हा काही उपाय नाही, असे परखड मत मांडले आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेता येणार आहे. मात्र त्यांना या कर्जाची परतफेड कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्र या चार राज्यांनी कर्जमाफीची घोषणा करत अंमलबजावणीला सुरुवात देखील केली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांपर्यंत याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईमध्ये सोमवारी शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला. या पार्श्वभूमीवर स्वामीनाथन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना परखड मत मांडले. कर्जमाफी हा काही उपाय नाही. कर्जमाफीची मागणी ही कृषी व्यवस्थेतील अर्थकारण हे किती अव्यवहार्य आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कृषी उद्योग हा आर्थिकदृष्ट्या कसा स्वयंपूर्ण बनेल यासाठी उपाययोजना केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेता येणार आहे. मात्र त्यांना या कर्जाची परतफेड करता यावी यासाठी शेतीला स्वयंपूर्ण बनवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मात्र, मी कर्जमाफीच्या विरोधात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील हरितक्रांतीचे जनक म्हणून स्वामीनाथन यांना ओळखले जाते. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वामीनाथन यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.