व्यक्ती, संघटनांच्या इशाऱ्यामुळे मतमोजणीत अडथळ्याची भीती

नवी दिल्ली : देशाच्या निरनिराळ्या गटांनी हिंसाचाराला चिथावणी देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांत हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन दक्ष राहावे, अशी सतर्कतेची सूचना मतमोजणीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली.

कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्याबाबत आपण राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना सांगितले असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

गुरुवारी होणाऱ्या मतमोजणी संदर्भात देशाच्या निरनिराळ्या भागांत हिंसाचार उसळण्याच्या शक्यतेबाबत गृहमंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना खबरदारीचा इशारा दिला असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे जिथे ठेवण्यात आली आहेत त्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी होणार असलेली ठिकाणे यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिले आहत.

हिंसाचाराला चिथावणी देण्याबाबत, तसेच मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याबाबत विविध घटकांनी केलेले आवाहन आणि विधाने या पाश्र्वभूमीवर ही सूचना देण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

विशेषत: उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व त्रिपुरा या राज्यांमधील काही संघटना आणि व्यक्ती यांनी जी वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे हिंसाचार तसेच मतमोजणीत अडथळा उद्भवू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.