बसपा प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. तरीही त्यांना पंतप्रधान होण्याचा विश्वास आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली. त्यामुळे मायावतींनी ट्विट करत आपल्या नाराज कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांनी मी निवडणूक लढवणार नसल्याने निराश होऊ नये. १९९५ मध्येही मी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मी उत्तर प्रदेशच्या कोणत्याच सभागृहाची सदस्य नव्हते. अगदी त्याचपद्धतीने केंद्रातही पंतप्रधान किंवा मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभेवर जाता येते. अशावेळी सध्या निवडणूक न लढण्याच्या माझ्या निर्णयामुळे कोणीही निराश होण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये मागील २ वर्षांत दंगल झाली नाही हा भाजपाचा दावा अर्धसत्य आहे. या दरम्यान भाजपाचे सर्व मंत्री, नेते आपल्यावरील गंभीर गुन्हे मागे घेण्याच्या कामात व्यस्त होते. मॉब लिचिंग कसे विसरले जाऊ शकते. यामुळे देशावर लाजीरवाणी वेळ आली होती. अखेर न्यायालयाला याची दखल घ्यावी लागली होती.

दरम्यान, ऐन निवडणुकीपूर्वी बुधवारी मायावती यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर मी जेव्हा वाटेल तेव्हा लोकसभा निवडणूक जिंकू शकते. पण यावेळी मी निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले होते. सपा आणि बसपाची आघाडी चांगल्या स्थितीत आहे. उत्तर प्रदेशमधील ८० लोकसभा जागांवर सपा-बसपा आणि रालोद यांच्यादरम्यान जागेचे वाटप झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते.