लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात प्रचारात हळूहळू रंग भरताना दिसत आहे. कर्नाटकात असाच एक ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना चक्क एका जाहीर कार्यक्रमात ढसाढसा रडू लागले. घराणेशाहीचा होत असलेला आरोप पाहून भावूक झालेल्या देवेगौडांना अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी देवेगौडा यांचे सुपूत्र एच डी रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांनाही रडू कोसळले. दुसरीकडे भाजपाने देवेगौडांच्या अश्रूंवर टीका केली आहे. रडणे ही जरा कला मानली तर देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात प्राविण्य मिळवलेले आहे. आपल्या रडण्याच्या कलेने त्यांनी दशकांपासून जनतेला वेड्यात काढले असल्याचा टोला कर्नाटक भाजपाने लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांचे दोन्ही नातू निखिल कुमारस्वामी आणि प्रज्वल यांना क्रमश: मंड्या आणि हसन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे देवेगौडा कुटुंबीयांवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरच देवेगौडा आपली प्रतिक्रिया देत होते.

हसन येथे ते प्रज्वल यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आले होते. भाषण करताना ते अचानक भावूक झाले. माध्यमातून सकाळपासूनच देवेगौडा, रेवण्णा, कुमारस्वामी आणि त्यांच्या मुलांवरून इतके सारे आरोप होत आहेत, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी जेडीएस समर्थकांनी त्यांना शांत होण्याची विनंती केली. यावेळी प्रज्वल आणि रेवण्णा हेही भावूक झाले.

देवेगौडा यांचे मोठे सुपूत्र आणि राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री एच डी रेवण्णा यांचा प्रज्वल हा मुलगा आहे. ते हसन मतदारसंघातून काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार आहेत.

भाजपाने देवेगौडा कुटुंबीयांचे हे नाटक असल्याचा आरोप केला. रडणे ही कला मानली तर देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यात प्राविण्य मिळवले आहे. आपल्या रडण्याच्या कलेने ते अनेक वर्षांपासून जनतेला वेड्यात काढत आहेत. निवडणुकीपूर्वी देवेगौडा आणि कुटुंबीय रडतात. निवडणुकीनंतर त्यांना मतदान केलेले कुटुंबीय रडतात, असा टोला कर्नाटक भाजपाने ट्विट करून लगावला.