एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ अभियानावर हल्लाबोल केला आहे. पुलवामा, उरी आणि पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करत ओवेसींनी मोदींना तुम्ही कसले चौकीदार आहात, असा सवाल केला आहे. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात आव्हान देण्याची मागणी करत ओवेसींनी पंतप्रधान मोदी जर खरेच देशाचे ‘चौकीदार’ आहेत तर असीमानंदला निर्दोष ठरवणाऱ्या निर्णयाविरोधात सरकारने अपील करावे असे म्हटले आहे.

मोदी तुम्ही कसले चौकीदार आहात ? मृत्यू झालेल्यांमध्ये (समझोता एक्स्प्रेस स्फोट) २५ भारतीयही होते. बॉम्बस्फोट हे दहशतवादी कृत्य आहे. तुम्ही कसले चौकीदार आहात?, असे ओवेसी म्हणाले. हरयाणा येथील पंचकुला येथे एनआयएच्या विशेष न्यायालयाने बुधवारी समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी असीमानंदसह ४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. २००७ मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात ६८ जणांचा बळी गेला होता. यात बहुतांश पाकिस्तानी नागरिक होते.

जर मोदी खरच चौकीदार असतील तर त्यांनी त्वरीत न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याची घोषणा करावी. तुम्ही असीमानंदला का घाबरत आहात. असीमानंद एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले होते, असे समजले आहे, असे ते म्हणाले. पुलवामा, उरी आणि पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी या देशाला चौकीदार नव्हे तर एका प्रामाणिक पंतप्रधानाची गरज असल्याचे म्हटले. संविधानाला समजणारा देशाला पंतप्रधान हवा आहे.

जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात भारताला अपयश आले आहे. तोच धागा पकडत ओवेसी यांनी मोदी सरकारची ‘झोपाळा डिप्लोमसी’ अपयशी ठरल्याचा टोला लगावला.