लोकसभेत व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना मंगळवारी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खडे बोल सुनावले. कामकाजात अडथळा आणण्याचे गोंधळी खासदारांचे वेस्टेड इंट्रेस्ट आहेत. त्यांना नॅशनल इंट्रेस्टशी काही देणेघेणे नाही, असे महाजन म्हणाल्या.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी नेहमीप्रमाणे व्हेलमध्ये जमून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीमुळे अनेक सदस्यांना प्रश्न विचारण्यात अडचण येत होती. समुद्र किनाऱ्यावरील पोलीस ठाण्यांसंदर्भात प्रश्न विचारताना बिजू जनता दलाचे वैजयंत पांडा यांनी काँग्रेसच्या सदस्यांना शांत राहण्याची विनंती केली. आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि नॅशनल इंट्रेस्टचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सुमित्रा महाजन यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना नॅशनल इंट्रेस्टशी काही देणेघेणे नसल्याचे सांगत त्यांना केवळ कामकाजात अडथळे आणण्याचा वेस्टेड इंट्रेस्ट असल्याचे सुनावले. गोंधळ घालणाऱ्या सर्व सदस्यांची नावे टिपण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.