यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशात तीन सशक्त महिला नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही २०१४ सालच्या निकालांची पुनरावृत्ती करण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. पण यावेळी मोदींना उत्तर प्रदेशात तीन सशक्त महिला नेत्यांचा सामना करावा लागेल. गेल्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपाने लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागांवर एकतर्फी विजय मिळवला होता.

त्यावेळी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी समाजवादी पार्टीसोबत आघाडी करुन त्यांनी मोदींसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. गांधी घराण्यातील प्रियंका गांधी वड्रा या सुद्धा राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशात विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

समाजवादी पार्टीकडून खासदार डिंपल यादवही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. परिवारवादाचा आरोप संपवण्यासाठी डिंपल यादव निवडणूक लढवणार नाहीत असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव सांगत होते. पण डिंपल यादवही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे मोदींसमोर तीन महिला नेत्यांचे आव्हान असणार आहे.

चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या मायावती यांचा पक्ष २००९ पासून पराभवाचा सामना करत आहेत. त्यांची प्रामुख्याने दलित मतांवर भिस्त आहे. प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे करिष्मा असला तरी राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना कमकुवत आहे.

त्यांच्या आगमनाने उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांच्याबद्दलचा हा विश्वास, उत्साह कितपत मतांमध्ये परावर्तित होतो ते महत्वपूर्ण ठरणार आहे. कनौजमधून दोन वेळा खासदार बनलेल्या डिंपल यादव या सध्याच्या घडीला समाजवादी पार्टीतील मजबूत महिला नेत्या आहेत. अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा वावर असतो. पती आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव महत्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला घेतात.