वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपातून हकालपट्टी झालेल्या नगरसेवकाने एका वृद्धाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष कोल्हे असे या मारहाण करणाऱ्या नेत्याचे नाव आहे.
अकोल्यात राहणारे सामाजिक कायकर्ते भाई रजनीकांत हे शेतकरी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी व्हॉट्स अॅपवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणारी पोस्ट टाकली होती. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर या पोस्टमधून टीका करण्यात आली होती. ही पोस्ट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संतोष कोल्हे यांना देखील व्हॉट्स अॅपवर आली होती. शनिवारी भाई रजनीकांत हे कामानिमित्त दर्यापूरमध्ये आले होते, संतोष कोल्हे आणि त्यांच्या दोन – तीन साथीदारांनी भाई रजनीकांत यांना गाठले.

चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांनी भाई रजनीकांत यांना बस स्टँडजवळील चहाच्या टपरीवर नेले आणि तिथे त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात पोस्ट का टाकली, याचा जाब विचारला. कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी भाई रजनीकांत यांना मारहाण केली. संतोष कोल्हे यांच्या समर्थकांनी या मारहाणीचे व्हिडिओ शुटींगही केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संतोष कोल्हे भाजपाचे, पण हकालपट्टी झालेले
संतोष कोल्हे हे भाजपाचे नगरसेवक असले तरी दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपा उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी दिली. संतोष कोल्हे हे आगामी निवडणूत वंचित आघाडीच्या तिकीटावर लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काय सांगितले ?
प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत या घटनेचा निषेध केला आहे. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही. पण माझी बदनामी करण्याचाही कोणाला अधिकार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.