पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडन दौऱ्यावर दाखल झाले, की त्यांच्याकडून पहिली ग्वाही काय मिळवायची?.. लंडनहून अहमदाबादला ये-जा करण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करा, असे एकमुखी साकडे इंग्लंडमध्ये वास्तव्य करणारे गुजराती बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालणार आहेत.

इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सुमारे सोळा लाख एवढी आहे. येथील राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय वर्तुळावरही भारतीयांचा ठसा आहे. ब्रिटिश संसदेपासून लंडनच्या महापालिकेपर्यंत आणि लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील अद्ययावत ‘डाटा सायन्स इन्स्टिटय़ूट’पासून या महानगरीच्या वाहतूक व्यवस्थेपर्यंत, सर्व महत्त्वाची सूत्रे भारतीयांच्या हातात आहेत.
लंडनमधील सारी वाहतूक व्यवस्था तर शशी वर्मा नावाच्या भारतीयाच्या इशाऱ्यावरच चालते. ‘आधी विकास आणि मग पायाभूत सुविधांची उभारणी’ हे उफराटे धोरण भारताने सोडून दिले, तर भारतातील महानगरांतही लंडनसारखी चोख वाहतूक व्यवस्था शक्य आहे असे वर्मा मानतात, तर मोदी यांनी भारतात गुंतवणूकदारांना विश्वास देणारी व्यवस्था निर्माण केली तर विकासाचा वेग आणखी वाढेल असे येथील भारतीय उद्योजक म्हणतात.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात याच विश्वासाची सर्वाना अपेक्षा आहे. राजनैतिक पातळीवर भारत इंग्लंड दरम्यान करारमदार होतील, पण ते कागदावरून प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे असेल.मोदी यांच्या दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमानिर्मिती होत असली तरी सध्या तरी त्यातून फारसे काही ठोस हाती लागताना दिसत नाही, असेही येथील अनेकांचे मत आहे. मोदी यांच्या दौऱ्याला जागतिक स्तरावर मिळणारी प्रसिद्धी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी चर्चा यांचा बिहार तसेच त्यानंतर लागोपाठ होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपला मात्र फायदा होईल, असे येथील काहींना वाटते. असे असले तरी येथील गुजराती समाजात मात्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत कमालीचा उत्साह आहे. अहमदाबाद लंडनदरम्यान थेट विमानसेवा सुरू करून प्रवासाचा वेळ निम्म्यावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ग्वाही दिली, की आमचे भारतासोबतचे व्यावसायिक अंतरही कमी होईल, अशी ग्वाही लंडनच्या उद्योगविश्वात भक्कमपणे स्थिरावलेल्या गुजराती समाजातील उद्योजक देतात.