X

सर्जिकल स्ट्राइकच्या ‘हिरो’ला काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी, ‘टास्क फोर्स’चं करणार नेतृत्व

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जातंय

लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस पक्षाने मोठी खेळी खेळली असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका टास्क फोर्स (कृती दल) ची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानवर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे ले. जनरल डी. एस. हुड्डा (निवृत्त) या कृती दलाचे नेतृत्व करणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. हे कृती दल देशाच्या सुरक्षेसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहे. तज्ज्ञ मंडळींशी विचार-विनिमय करून हुड्डा एक डॉक्युमेंट तयार करणार आहेत. काँग्रेस पक्षाने गुरुवारी टि्वटरद्वारे ही माहिती दिली.

2016 साली जम्मू-काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर या सर्जिकल स्ट्राइकचा नंतर केंद्र सरकारने जोरदार प्रचार केला होता. सर्जिकल स्ट्राइकचा इतका गाजावाजा करायची आवश्यकता नाही असे हुड्डा यांनी म्हटले होते. हुड्डा यांच्या या विधानानंतर तेव्हा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोलही केला होता.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.