लखनऊ : येथून जवळच असलेल्या एका कालव्यात गुरुवारी एक पिक-अप व्हॅन कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मुले बुडाली असून त्यापैकी तीन मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत तर अद्याप चार मुलांचा शोध लागलेला नाही. या व्हॅनमधील अन्य २२ जणांना वाचविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लखनऊ शहरापासून जवळच असलेल्या नागराम परिसरातील इंदिरा कालव्यामध्ये पहाटे २९ जणांना घेऊन जाणारी एक व्हॅन कोसळली, असे लखनऊचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले.

विवाह समारंभ आटोपून शेजारच्या बाराबंकी जिल्ह्य़ातून या व्हॅनमधून प्रवासी परतत होते. या व्हॅनमधील २२ जणांना वाचविण्यात आले असले तरी दोन मुलींसह सात मुले बुडाली होती त्यापैकी तीम मुलांचे मृतदेह हाती लागले असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे, ही मुले पाच ते १० वर्षे वयोगटातील आहेत. ही मुले प्रवाहात वाहून गेली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, मदतकार्य वेगाने सुरू आहे, असे शर्मा म्हणाले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, बेपत्ता मुलांच्या पालकांनी व्हॅनचालक मद्याच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे. व्हॅनचालक दारूच्या नशेत होता, तो वेगाने गाडी चालवत होता आणि वळणावर त्याचे नियंत्रण सुटले आणि वाहन कालव्यात कोसळले, असा आरोप लज्जावती या महिलेने केला.  दुर्घटना घडल्यानंतर व्हॅनचालक पसार झाला नाही, असे शर्मा यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये वऱ्हाडाला अपघात, ५ जण ठार

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्य़ात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या व्हॅनची एका चार चाकी वाहनाशी धडक झाल्याने पाच लोक ठार, तर ४२ लोक जखमी झाले. शेजारच्या दंतेवाडा जिल्ह्य़ात एक विवाह सोहळा आटपून वऱ्हाड परतत असताना बुधवारी रात्री पांदेमुर्गा खेडय़ाजवळ हा अपघात झाला. बिजापूर जिल्ह्य़ाच्या तिडोदी खेडय़ातील सुमारे ५० लोकांना घेऊन जाणारी व्हॅन विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला धडकली. यात व्हॅनमधील चार जण जागीच ठार झाले, तर जखमी झालेल्या ४३ लोकांना नजीकच्यारुग्णालयांत दाखल करण्यात आले.