लखनौच्या गुरुद्वारा प्रबोधक समितीकडून करोना रुग्णांच्या मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत पोचवण्यासाठी मोफत शववाहिकेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या समितीचे अध्यक्ष सरदार राजेंद्र सिंग बग्गा यांनी सांगितलं की आम्ही दररोज साधारण बारा करोनाबाधितांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहचवण्याचं काम करत आहोत.

ते म्हणतात, आम्ही एप्रिल महिन्यापासून सार्वजनिक भोजनालय सुरु केलं आहे आणि आता करोना रुग्णांच्या मृतदेहांची ने-आण कऱण्याचीही सोय केली आहे. ही सेवा सर्वांसाठी असून ती मोफत आहे. गरीब आणि गरजू लोक या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेती अशी आशा करतो. शीख लोक हे शूर आहेत. आम्हाला माहित आहे की परीक्षा घेणाऱ्या कठीण काळात लोकांची सेवा कशी करायची. आम्ही करोना रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहचवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.

आणखी वाचा- MP: हजार खाटांचं जंबो कोविड सेंटर आणि भव्य पडद्यावर दिसणार रामायण

तसंच महानगर, ऐशबाग, गोमती नगर आणि आलमबाग यासह शहरातल्या इतर भागातल्या गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन लंगरचंही आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गृहविलगीकरणात असणाऱ्या पण ऑक्सिजनची गरज लागत असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात येतो. ज्या कोणाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपला अर्ज आणि ऑक्सिजनची गरज असल्याचं सांगणारं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जवळ बाळगणं अनिवार्य असणार आहे.

आणखी वाचा- २० दिवसात १८ प्राध्यापकांचा करोनामुळे मृत्यू; अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचं ICMR ला पत्र

त्याचबरोबर रुग्णाचे रिपोर्ट्स आणि आधार कार्डही सादर करणं आवश्यक असणार आहे. रिकामा सिलेंडर घेऊन या गुरुद्वारांमध्ये यायचं आहे आणि भरलेला सिलेंडर घेऊन परत जायचं आहे. शीखांच्या केंद्रीय सिंग सभेने याबद्दल जिल्हा प्रशासनाची परवानगीही घेतली आहे.