द्रमुकचे सर्वेसर्वा एम करूणानिधी यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. करूणानिधींच्या निधनाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. कावेरी रूग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. अनेक कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला आहे. कार्यकर्ते धाय मोकलून रडत आहेत. याचदरम्यान, करूणानिधींचे पुत्र एम के स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी करूणानिधी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. कार्यकर्त्यांना शिस्त बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

चेन्नईतील कावेरी रूग्णालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. तशीच परिस्थिती राज्यात विविध ठिकाणी दिसत आहे. करूणानिधी यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यापासून राज्यभरात २१ हून अधिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याचे द्रमुकने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

कार्यकर्त्यांनी शांतता राखत शिस्तीचे पालन करावे. करूणानिधींवर उपचार करणारे डॉक्टर आणि कावेरी रूग्णालय प्रशासनाचा मी आभारी आहे, अशा आशयाचे पत्रक स्टॅलिन यांनी प्रसिद्ध केले आहे.